अंबरनाथ बदलापूर नगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तास तशी आरक्षण सोडतीबाबतचा गुंता अजुनच वाढत आहे. त्यात १८ तारखेला होणारी पत्रकार परिषद ही पुढे ढाकळ्यात आली. त्या मुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा चालू आहे. मात्र या चर्चांना पूर्णविराम लावण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या पद्धतीनेचं होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कोणीही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेने निवडणुकीची तयारी जोरात सुरु केली आहे. निवडणुक आरक्षण सोडतीवर सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे मात्र निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेला कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. त्यात 18 फेब्रुवारी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लांबणीवर गेला असून त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम वाढला आहे. शहरातील काही दिग्गज राजकीय मंडळींना त्यांच्या सोयीनुसार आणि सुरक्षित तसेच निवडून येणाऱ्या प्रभागानुसार आरक्षण सोडत हवी असल्याने राजकीय हस्तक्षेपापासून प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रमात विलंब होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शहरातील काही मंडळींकडून अनुसूचित जाती आणि जमाती आरक्षण मिळवून देण्यासाठी घोडेबाजार सुरू असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र या सर्व घडामोडींमुळे निवडणूक आयोग आणि नगरपालिकेने तयार केलेल्या प्रारूप आराखडा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निवडणुकीची सर्व प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या नियम आणि आदेशांचे काटेकोर पालन करत केली जाणार आहे. त्यामुळे आरक्षण बदलण्याच्या भूलथापांना बळी पडू नका असे ते म्हणाले निवडणुकीच्या प्रक्रियेत सर्व माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर टाकली जाणार असून त्यामुळे पारदर्शक आणि स्वच्छ निवडणूक होण्यास मदत होणार आहे.