अंबरनाथ :
येत्या शनिवार ता. 29 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत वडवली विभागातील रोटरी सभागृहात अंबर युवा शास्त्रीय संगीत रजनी आयोजित करण्यात आली आहे. मैफलीच्या पहिल्या सत्रात गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे मार्गदर्शन लाभलेला व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर याचे व्हायोलिन वादन होईल. त्याला तबला साथसंगत तबलावादक तेजोवृष जोशी तर संवादिनी साथसंगत संवादिनी वादक लीलाधर चक्रदेव यांची असेल.
मध्यंतरानंतर होणाऱ्या दुसऱ्या सत्रात, संगीतभूषण पंडित राम मराठे यांचा नातू भाग्येश मराठे याचे शास्त्रीय गायन होईल. भाग्येशच्या गायनाच्या साथीला संवादिनी साथसंगत पुन्हा एकदा युवा संवादिनीवादक लीलाधर चक्रदेव यांचीच तर तबला साथसंगत युवा तबलापटू तनय रेगे यांची असेल.
शेवटच्या सत्रात दोघेही सहसादरीकरण करतील. कार्यक्रमाच्या सुरवातीला अंबरनाथमधील बालतबलापटू कु. अथर्व लोहार याचा त्याला नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते ' प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार 2020 ' प्राप्त झाल्याबद्दल गौरव करण्यात येईल. नवी मुंबई येथील गोपाळ चारीटेबल ट्रस्ट आणि मुंबई मधील पॅरामिन अॅडव्हर्टायझिंग या संस्थांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे. रसिक श्रोत्यांना कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश आहे.