महाविकास आघाडीद्वारेच ठाणे जिल्ह्याचा विकास होईल - जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांची ग्वाही

 

मुरबाड,  : राज्यातील महाविकास आघाडी सरकारद्वारेच ठाणे जिल्ह्याचा सर्वोतोपरी विकास होईल. त्यादृष्टीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पावले टाकली जात आहेत, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी गुरुवारी येथे दिली.
मुरबाड तालुक्यातील जायगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, पंचायत समितीचे उपसभापती अनिल देसले, जायगावचे सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.
ठाणे जिल्हा परिषदेला सर्वोतोपरी साह्य करण्याचे आश्वासन नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे, अर्थ मंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविले जाणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ठाणे जिल्ह्याचा विकास होईल, हे निश्चित, अशी ग्वाही सुभाष पवार यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्याच्या विविध भागात विकासकामे सुरू आहेत. यापुढील काळात शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी जिल्हा परिषद कार्यरत राहील. त्याचबरोबर दुर्गम भागात प्रवासासाठी चांगले रस्ते तयार करण्यावर आमचा भर राहील, अशी ग्वाही सुभाष पवार यांनी दिली.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...