अंबरनाथ : अंबरनाथच्या पुरातन शिवमंदिराजवळून खळाळत जाणारी वालधुनी नदी पुन्हा वाहती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचा संकल्प वालधुनी नदी बचाव समिती (नियोजित) तर्फे करण्यात आला आहे. येत्या 22 मार्च रोजी जलदिनाच्या मुहूर्तावर विशेष कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट चे माजी अध्यक्ष सी. ए. देवेंद्र जैन यांच्या कार्यालयात वालधुनी नदी बचाव समितीची बैठक काल रात्री संपन्न झाली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. समितीच्या निमंत्रक डॉ. पूर्वा प्रमोद अष्टपुत्रे यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक संपन्न झाली. समितीचे सल्लागार देवेंद्र जैन, सरचिटणीस हेमंत मंडल, सौ. वैशाली मंडल, प्रवीण काळे, प्रशांत मोरे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्य शासनाने उल्हास नदी आणि वालधुनी नदी संवर्धनासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. वालधुनी नदीचा उगम ज्या ठिकाणी झाला, तेथून हि नदी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराजवळून खळाळत वाहत होती. हे दृश्य अनेकांनी पाहिले आणि अनुभवले आहे. मात्र 1990 च्या दशकापासूनअतिक्रमण आणि प्रदूषणामुळे या नदीचे नाल्यात रूपांतर झाल्याचे पहावयास मिळत आहे. वालधुनी नदी बचाव समिती गेल्या पाच वर्षांपासून विविध कार्यक्रम व उपक्रमाद्वारे वालधुनी नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जलपुरुष डॉ. राजेंद्र सिह, रो. डॉ. हेमंत जगताप, डॉ. सुरेश खानापूरकर आदी मान्यवरांनी या समितीच्या पुढाकाराने वालधुनी नदी उगम स्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
दर वर्षी या समितीच्या पुढाकाराने वालधुनी नदी क्षेत्रात जलदिंडीचेही आयोजन केले जाते. या जलदिंडीत लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक, शिक्षक सहभागी होत असतात. शहरातील भगिनी मंडळ शाळेसह अन्य शाळेतील विद्यार्थी सोशल मीडियावर या नदीबाबत विविध प्रतिक्रिया व फोटो शेअर करीत असतात.
येत्या 22 मार्च रोजी जलदिन आहे. त्या दिवशी वालधुनी नदी उगम स्थळापासून जलदिंडी काढून प्राचीन शिवमंदिरात अभिषेक करणे आणि तत्सम कार्यक्रम करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याच प्रमाणे वालधुनी नदी उगमा पासून पुन्हा वाहाती करण्याबाबतचा प्रकल्प आराखडा तयार होत आला आहे. हा आरखडा राज्याचे पर्यावरण प्रेमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा सौ. मनीषा वाळेकर यांचेसह शहरातील सर्वपक्षीय अध्यक्ष, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था यांना सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 