मुंबई :- देशातील अत्यंत महत्त्वाचं आणि प्रतिष्ठेचं पद असलेल्या मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांची वर्णी लागली आहे. पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत असलेल्या दहा ते बारा जणांना मागे टाकत परमबीर सिंह यांची निवड झाली आहे. राज्य सरकारने परिपत्रक काढून ही घोषणा केली.
संजय बर्वे मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार, याकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी या सस्पेन्सवर पडदा पडला.
मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे आज 29 फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले. खरं तर त्यांना केवळ एक वर्षाचा कालावधी मिळाला होता. मात्र, आधी लोकसभा निवडणुका आणि नंतर विधानसभा निवडणुकांमुळे त्यांना दोनदा मुदतवाढ मिळाली. त्यांच्या चांगल्या कामामुळे त्यांना सहा महिने अधिक मिळाले. मात्र, आता ते निवृत्त झाले.
संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचा पोलिस आयुक्त कोण होणार याची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती. या पदावर राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख परमबीर सिंह, राज्याच्या टेक्निकल विभागाचे प्रमुख हेमंत नगराळे, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, पुण्याचे पोलीस आयुक्त के वेंकटेशम, सध्या केंद्रात प्रति नियुक्तीवर असलेले सदानंद दाते या पाच अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होती.