बदलापूर :- नगरपालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच बदलापुरातील नागरिकांना खुष करणारा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने सादर केला आहे. ४३८ कोटी रूपये खर्चाचा आणि ३ कोटी २६ लाख रूपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. निवडणुकांच्या तोंडावर नागरिकांना सेफ सिटी, प्रशासकीय इमारतीचे आश्वासन देत बाळासाहेब ठाकरे स्मारक, आगरी भवन आणि क्रीडा संकुलासह अंपग पुनर्वसनासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा पालिकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी आर्थिक वर्ष २०२०-२१ चे अंदाजपत्र सादर करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष प्रियेश जाधव, मुख्याधिकारी प्रकाश बोरसे आणि उपनगराध्यक्ष राजश्री घोरपडे यांनी हे अंदाजपत्रक सभागृहापुढे मांडले. कुळगाव बदलापूर नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेसाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा मानला जात होता. त्यानसार यंदाच्या अर्थसंकल्पात प्रशासकीय इमारतीसाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर शहरातील महत्वाचे रस्ते आणि चौक सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी ४ कोटी रूपयांची तरतूद करत सेफ सिटीचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले आहे. १६१ कोटींच्या प्रारंभिक शिलकेसह ४४१ कोटी जमा आणि ४३८ कोटी खर्चाचे हे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. ३ कोटी २६ लाख रूपये शिलकीचे हे अंदाजपत्रक सादर करत असताना कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. आगरी समाजाला खष रूपयांची करण्यासाठी आगरी भवनाचे सिटीचे आश्वासनही या अर्थसंकल्पात देण्यात आले आहे. त्यासाठी ५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात प्राथमिक शिक्षणासोबत सुरू करण्यात आलेल्या माध्यमिक शिक्षणासाठीही दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात इयत्ता ६ वी ते १० च्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब दिले जाणार आहेत. त्यासह महिला आणि बालकल्याण, घनकचरा व्यवस्थापन, नगरपालिकेच्या मालमत्ता सुरक्षित करणे, साथीच्या रोगांवरील नियंत्रण मिळवणे आणि प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.. यासह विविध संयुक्त प्रकल्पांसाठी पालिकेच्या हिश्श्याची रक्कमही सुरक्षित करण्यात आल्याची माहिती लेखापाल प्रविण वडगाये यांनी दिली आहे.
महत्वाच्या तरतूदी
क्रीडा संकुल - ५ कोटी रात्रनिवारा - ३ कोटी तलाव सुशोभिकरण - ५ कोटी
रस्ते - ३० कोटी दलित वस्ती सुधारणा - ५ कोटी भुयार गटार योजना - १४ कोटी
घनकचरा व्यवस्थापनासाठी - २० कोटी