अंबरनाथ – प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र ओळख असते त्याप्रमाणे अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर मंदिर ही ठाणे जिल्ह्याची ओळख होण्याच्या दृष्टीने प्रस्ताव विचाराधीन असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अंबरनाथला केले.
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या अभ्यासिका डॉ. कुमुद कानिटकर यांचा जाहीर सत्कार नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांच्या पुढाकाराने सोमवार (17) रोजी शिवमंदिराच्या प्रांगणात जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या हस्ते नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.
पुणे , औरंगाबाद आदी जिल्ह्याची ओळख त्या- त्या ठिकाणच्या ऐतिहासिक , पौराणिक वास्तूंवरून करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्याची ओळख अंबरनाथच्या शिवमंदिरावरून व्हावी असा प्रस्ताव विचाराधिन असल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले. कुमुद कानिटकर यांच्या अंबरनाथ शिवालय या पुस्तकावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर मंदिराची महती समजल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वीचे गावपण ते आता महापालिकेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या अंबरनाथमधील शिवमंदिरात अपेक्षित बदल झालेला दिसून आला नाही,अशी खंत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली, आता मात्र मंदिराचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंदिराच्या सुशोभिकरणासाठी आग्रही भूमिका घेतली आहे, आमदार , नगराध्यक्षा पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यां समवेत पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत मंदिर सुशोभिकरणाच्या आराखड्यावर निर्णय होणार आहे, मंदिर आणि परिसर सुंदर करण्याची हीच ती वेळ आहे , असेही जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले.
पुरातन शिवमंदिराचे जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, मंदिराच्या सुशोभीकरणात पुरातत्व खाते अडचणी आणत असल्याचा आरोप नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी केला.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या हस्ते लेखिका कानिटकर यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. शिवमंदिराचे पुजारी आणि ग्रामस्थांनी देखील कानिटकर आणि जिल्हाधिकारी नार्वेकर यांचा सत्कार केला. यावेळी कुमुद कानिटकर यांनी मंदिराबाबत सविस्तर माहिती विशद केली .
नगरसेवक निखिल वाळेकर, रवी पाटील, विजय पाटील, परशुराम पाटील, माजी नगरसेवक विजय पाटील. सुरेश पाटील प्रा. अरुण मैड, देवेंद्र जैन, दत्ता घावट, पोलीस उपायुक्त विनायक नराळे, पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा आदी यावेळी उपस्थित होते. जगदीश हडप यांनी सूत्रसंचालन केले. 