बदलापूर: कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत आणि प्रभागरचना येत्या २५ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. गेल्या महिन्याभरात सलग दोन वेळा ही आरक्षण सोडत आणि प्रभाग रचना जाहीर होण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने पुढे कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्याने बदलापूर अंबरनाथ मधील कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक व लोकप्रतिनिधींमध्ये धाकधूक वाढत होती. साऱ्या शक्यता आणि तर्कवितर्काना पूर्णविराम देत अखेरीस राज्य निवडणूक आयोगाने येत्या २५ फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडत घेण्यास मान्यता दिल्याने गेल्या महिन्याभरापासून लागून असलेली उत्सुकता आता संपली आहे. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात ही आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रभाग रचनेत बदल
कुळगाव - बदलापूर नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेत राज्य निवडणूक आयोगाने काही बदल सुचवले आहेत. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांना धरून प्रभागरचना केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. यापूर्वी कुळगाव-बदलापूर नगर परिषदे मार्फत गटार आणि नाले व काही मुख्य इमारतींना धरून प्रभाग रचना करण्यात आली होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक मार्गदर्शन तत्त्वांचा आधार घेत ही प्रारूप प्रभाग रचनेत बदल करून आरक्षण सोडत घेण्यास मान्यता दिली आहे.