बदलापूर :.कोरांना विषाणूचा संसर्ग राज्यात सध्या सर्वत्र पसरत असताना भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. पण राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून करण्यास काढण्यासाठी आणि
थॅलॅसिमिया ग्रस्त मुलांना तातडीने रक्ताची गरज असल्याचे ओळखून बदलापुरात माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते अशिष गोळे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं. संचारबंदी असतानादेखील बदलापूरातील तब्बल 36 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने या रक्तदात्यांचा सर्वत्र कौतुक होत आहे. काका गोळे फाउंडेशन आणि सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड बँक,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमान हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. ब्लड बँकेच्या गाडीतच रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलं. अवघ्या तासाभरात बदलापूरकरांनी रक्तदान शिबिराला दिलेला प्रतिसाद हा वाखाणण्याजोगा असून कोरोनासारख्या महाभयंकर आजाराशी लढताना रक्तदाते पुढे आल्याने त्यांचा करावं तेवढं कौतुक कमी असल्याचं गोळे यांनी सांगितलं. यापुढील काळात देखील रक्ताची अजून गरज लागणार असून रक्तदात्यांचे नावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. जशी आवश्यकता भासेल त्यानुसार पुन्हा एकदा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे गोळे यांनी सांगितले. बदलापुरकरांनी ह्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता संवेदनशील नागरिक हे तातडीने रक्तदानासाठी पुढे येत असल्याबद्दल रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केलं. तसंच या रक्तदान शिबिराच्या वेळी थॅलॅसिमिया ग्रस्त मुलांचे पालक देखील उपस्थित होते. त्यांनी देखील रक्तदात्यांचे मनापासून आभार मानले.