राज्यभरात २२,११८ खोल्यांची सज्जता; ५५,७०७ खाटांची सोय! - सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची माहिती


मुंबई, :कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल २२ हजार ११८ खोल्यांची सज्जता करण्यात आली असून, या ठिकाणी ५५ हजार ७०७ खाटांची सोय होऊ शकेल.


राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. यासंदर्भात ते म्हणाले की, कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले आहे. राज्यातील परिस्थितीत नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र गरज भासलीच तर राज्य सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शेकडो शासकीय इमारतींमधील २२ हजार ११८ खोल्या प्रशासनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये विश्रामगृहे, वस्तीगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारती आदींचा समावेश आहे. या ठिकाणी वीज, पाणी अशा सुविधा देखील उपलब्ध असतील. या खोल्यांचा वापर विलगीकरण तसेच तात्पुरत्या स्वरूपातील रूग्णालय म्हणून केला जाऊ शकतो. आपात्कालीन यंत्रणेने यातील अनेक इमारतींचा वापर देखील सुरू केला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हे कर्मचारी हवे त्यावेळी उपलब्ध असतील, अशीही माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...