बदलापूर: डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (ता.१) बदलापुरात रक्ततदा शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ वा.पासून संध्याकाळी ५ वा.पर्यंत सुरू राहीलेल्या या रक्तदान शिबिरात २३५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे सकाळपासून रक्तदात्यांच्या रांगा लागल्या होत्या आणि शिबिराची वेेेळ संपूनही रक्तदाते रांगेत होते.
बदलापूर पूर्वेकडील आदर्श विद्या मंदिर शाळेत या रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वा.पर्यंत २३५० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. चार वर्गांमध्ये रक्तदानाची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रत्येक वर्गामध्ये एका वेळी २० याप्रमाणे ८० रक्तदात्यांच्या रक्तदानाची व्यवस्था करण्यात आली होती. जे जे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे व सेन्ट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथील रक्तपेढीत हे रक्त संकलित केले जाणार आहे. या रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांच्या देखरेखीखाली हे रक्त संकलन करण्यात येत होते. तर इतर वर्गांमध्ये रक्तदात्यांची बसण्याची, फॉर्म भरण्याची, तपासणी करण्याची तसेच चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. ६०० श्री सदस्य ही सर्व व्यवस्था पाहत होते. या शिबिराचे नियोजन करण्यासाठी हे श्री सदस्य मेहनत घेत होते. त्यातून रक्तदान शिबिरासाठी वर्गांची व परिसराची साफसफाई तसेच सुशोभीकरण आदीची चोख व्यवस्था करण्यात आली होती.
बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख, बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी दशरथ राठोड आदींसह सामाजिक-राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या शिबिरात रक्तदान केले.
उस्फुर्त प्रतिसाद
या रक्तदान शिबिरात १५०० बाटल्या रक्त संकलित होईल,अशी अपेक्षा होती. मात्र सकाळपासूनच रक्तदात्यांनी गर्दी केल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत हा आकडा १५०० पर्यंत पोहचला. आणि संध्याकाळी ५ वा. पर्यंत २३५० वर गेला. आणखीही रक्तदाते रांगेत होते,मात्र वेळेअभावी रक्तदान थांबविण्यात आल्याने अनेक रक्तदात्यांना रक्तदान करता आले नाही. 