महावितरणाच्या भोंगळ कारभाचा फटका अपेक्षेप्रमाणे पाणीपुरवठा यंत्रणेला बसल्याने बदलापूर शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा ढेपाळली. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवारी सुट्टी असल्याने नागरिक होळीची मजा लुटण्याच्या मूडमध्ये असतानाच ऐन धुळवडीच्या दिवशी शहरातील उंच भागात कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. तीन दिवस नागरिकांची पाण्यासाठी त्रेधातिरपीट पहायला मिळाली. धुळवडीमुळे जीवन प्राधिकरणाकडून मिळणारी टँकर सेवाही ठप्प असल्याने नागरिकांना आपल्या शेजाऱ्यांकडे पाण्यासाठी धावपळ करावी लागली. त्यामुळे नागरिकांनी वीज मंडळ आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नावाने शिमगा केला.
ऐन सणाच्या दिवसात बदलापुरातील लाखो नागरिकांना वीज आणि पाण्यापासून वंचित रहावे लागले. त्याचे परिणाम शहरात मंगळवारीही जाणवले. मंगळवारी धुळवडीच्या दिवशी पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होईल अशी आशा नागरिकांना होती. मात्र बदलापुरातील उंच भागात पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. बदलापूर पश्चिमेतील पाटील नगर, मांजर्ली, पोखरकरनगर आदी भागातील उंचा वरच्या इमारतींमध्ये याचा सर्वाधिक फटका बसला.
धुळवडीच्या दिवशी रंगाची उधळण करणे तर लांबच प्रातर्विधीसाठी सुद्धा नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. अनेक नागरिकांनी आपल्या मित्र आणि नातेवाईकांच्या घराचा आसरा घेतला. धुळवडीनिमित्त शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने नागरिकांना ऐनवेळी जीवन प्राधिकरणाकडून पुरवली जाणारी टँकर सेवाही मिळू शकली नाही. त्यामुळे नागरिकांच्या संतापात ऐन सणाच्या दिवशी भर पडली. त्यामुळे नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभाराप्रती संताप व्यक्त करत होते. अक्षरशः नागरिकांनी वीज वितरणाच्या बरोबरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नावाने शिमगा केला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बॅरेज बंधाऱ्यातून चोवीस तास पाणी उचलले जात असले तरी शहरातील उंच भागातील जलकुंभांमध्ये अपेक्षित पाणी पातळी होण्या इतके पाणीच येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील विविध उंच भागांना त्याचा फटका बसतो आहे, गेल्या वर्षभरापासून जीवन प्राधिकरण जलकुंभ भरत नसल्याची सबब सांगत असल्याने जलकुंभ भरतील कधी, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.