एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाऱ्या अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर नगरपालिकासह राजगुरुनगर, भडगांव, वरणगाव, भोकर, मोवाड आणि वाडी या नगरपालिका निवडणूका ३ महिने पुढे ढकलण्याची सूचना निवडणूक आयोगाला राज्य सरकारने केली आहे. राज्य सरकारने केलेली सूचना मान्य झाल्यास कुळगाव- बदलापूर नगरपालिकासह अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूका ३ महिने पुढे जाणार आहेत.
नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित प्रभाग रचना, आरक्षण व सोडातीचा कार्यक्रम संपन्न झाला असून जिल्हाधिकारी यांच्या स्थरावर सूचना हरकतींवर सुनावणी सुरू आहे. सूचना व हरकती झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती परंतु आता राज्य सरकारने निवडणूका ३ महिने पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना केल्याने नगरपालिका निवडणूक जुलै महिन्यात होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. त्या अंतर्गत राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने एप्रिल महिन्यात होऊ घातलेली नगरपालिका
निवडणुका ३ महिने पुढे ढकलण्याची निवडणूक आयोगाला सूचना केली आहे. निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेत याकडे सर्वांचं राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.