सखी तूच साक्षीदार ........

दिवस उगवला कि, त्या दिवसाचा सूर्य मला नव्या उमेदीन जगण्याची उर्मी  देतो. हीच नवी  उमेद माझ्या मनाला संजीवनी देत खूप काही करण्याचा संदेश देते अस वाटत .


 


 अवखळ वाहणारी नदी जशी सागराला अर्थ प्राप्त करून देते. कळी जशी फुलण्याच्या उमेदीने फुलाला फळाचे सौंदर्य प्राप्त करून देते.  सृष्टीच्या या देणगीला  सलाम करताना, स्त्रीला लाभलेल्या निसर्गदत्त देणगीमुळे मातृत्वाचा व नवनिर्मितीचा सोहळा होतो.हे पाहून मन आनंदित झाल्याशिवाय राहत नाही.  


स्त्रीत्वाचा हा सोहळा महिला दिनानानिमित्त एक दिवसाचा न राहता अखंडित प्रवाहित रहावा ही सदिच्छा.


 


 


ऋतू मागून ऋतू सरत असताना बालिका ,युवती, नववधू, पत्नी, माता, आजी अशा विविध भूमिकांचा स्वीकार करण तिला थोडं आव्हान असत. तरीही ती स्वतःची मतं बाजूला ठेऊन प्रत्येक चिंतेला अलगद  बाजूला सरकवून मार्ग काढणे आपल कर्तव्य समजते. अपवाद वगळता साऱ्याच जणी  आपल्या भोवतालच्या सर्वांचे जीवन सुखी समाधानी व्हावे या दृष्टीने प्रयत्न करताना दिसून येतात.


  


"स्त्री" -  पूर्वी, आत्ता व उद्या या दृष्टीने विचार केल्यास ,


पूर्वीच्या स्त्रीला  व्यक्तीस्वातंत्र्य  नव्हते. तिच्या मतांना मिळणारा आदर अतिशय अल्प प्रमाणात होता. बऱ्याचदा सामान्य स्त्रीच्या प्रश्नांकडे  कुणाच लक्षच नसायचं. तिचं  अस्तित्व फक्त घरदार ,मुलेबाळे, नातेसंबध, संण–वार, पाहुणचार, सेवा, देवपूजा, यातच गुंतलेले असायच.  प्रत्येक धर्माची ,जातीची जीवन –पद्धती वेगळी. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सोहळे-दुखवटे वेगळे.नव्या गोष्टी शिकणे-नाकारणे वेगळे. हे सार आवडी आणि सवडीनुसार स्विकारल गेलं तर कधी नाकारलं गेलं. 


एकत्र कुटुंब पद्धतीत,मागच्या पिढीने पुढच्या पिढीला कळत नकळत रुजलेल्या जुन्या रूढी  परंपरा हस्तांतरित करायच्या आणि त्या पिढीने परत पुढच्या पिढीला त्या द्यायच्या. ह्या रूढी परंपरा काटेकोरपणे पाळणे तर असायचचं. त्यापेक्षा ते सक्तीचं असायचं. तरीही ति त्यातून आनंद शोधत असायची. ऊणदुण,भेदभाव,दुय्यमत्व बाजूला ठेवून, वास्तवाला धरून तडजोड करीत पुढे- पुढे जायचं एवढच तिच्या हाती असायचं.


हे सर्व नेमकेपणाने करताना आपल्या स्त्रीत्वाची भूमिका निभावताना  तिची  दमछाक व्हायची. तरीही कुणीतरी केलेल्या थोड्याश्या कौतुकाने तिच्यात स्फुरण चढायचं. एकत्र कुटुंबाचा रगाडा आवरताना दुसर्यांच्या आनंदात ती स्वत: आनंदित होत असे. तीला स्वतःकडे पहायला वेळच नसायचा. आपली जबाबदारी पूर्ण करणे एवढ समाधानही तिला पुरायचं. 


 


आताच्या परिस्थितीत हे सर्व ऐकून आणि पाहून मला बऱ्याचदा अवघडल्यासारखे वाटते या सर्वाचा विषाद वाटतो. 


आतामात्र काही प्रमाणात स्त्री-पुरुष समानता वाढीस लागली.लिंग भेद कमी होऊ लागला.विचारांची उंची जस-जशी वाढत गेली. तस-तशी या रूढी परंपरेच्या सक्तीची तीव्रता कमी होताना दिसू लागली. महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले,धोंडो केशव कर्वे यांसारख्या थोर समाजसेवकांनी स्त्रीला बुरसटलेल्या विचारांच्या जोखडातून बाहेर काढलं. त्यांचे व त्यांच्या सारख्या अनेकांचे या कार्यातील योगदान आदरपूर्वक मान्य करायला हवं .या बदलासाठी कित्येक दशकं अन्यायाशी झुंझाव लागलं आणि बदलत गेलं  हळू हळू अवती-भवतीच वातावरण .


 


आता स्त्री शिक्षित झाली. खऱ्या अर्थाने माजघरातून बाहेर आली.नवऱ्याच्या  बरोबरीने संसाराला हातभार लावणे साठी नोकरीही करू लागली. शहरी भागात तर ती पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागली.काही ठिकाणी तर ती आपल्या हुशारीच्या व कामाच्या जोरावर पुरुषांपेक्षा उच्च पदावर कार्यरत होऊ लागली. आपले कार्यालय, सांस्कृतिक क्षेत्र, समाजमाध्यमे अशा ठिकाणी ती निर्भिडपणे आपली मते मांडू लागली. 


 


शहरात हा बदल जरा बऱ्यापैकी आहे.ग्रामीण भागातील वेगळी शेतीप्रधान संस्कृती व एकत्र कुटुंबपद्धतीत स्त्रीयांना समानसंधी अजूनही दुरापस्त आहे.तरीही ग्रामपंचायत ,बचतगट या माध्यमातून ती व्यक्त होत आहे.       


स्त्री पुरुष समानतेच्या वाटेवरून चालताना ,कितीतरी गोष्टी अजून बदल होईल या आशेवर तग धरून आहेत.


 


अशा सर्व पार्शवभूमीवर उद्याची स्त्री ही सर्व पातळीवर नक्कीच सामर्थ्यवान व कर्तृत्ववान असणार आहे. सायकल मोटारसायकल पासून ती विमानही चालवत आहे. जल -जमीन -आकाश ती पादक्रांत करणार आहे.सरपंच ते पंतप्रधान, राष्ट्रपती अशा पदांबरोबरच, अंगणवाडी सेविका ते कंपनी संचालक.असा तिचा  विविध क्षेत्रातील वावर सहजच असणार आहे. आणि असायलाच हवा.


परंतू  चित्रपट,टिव्ही मालिका,वेब सिरीज व्हाट्स अप.फेसबुक ट्विटर या सारख्या समाजमाध्यमाच्या वापरात तिला वर्तमान व भविष्यातील धोके ओळखता आले पाहिजे.


येथे प्रत्येक स्त्रीनेच आपली भूमिका ठरवताना आपणच दुसऱ्या एखाद्या स्त्रीचे किंबहुना तिच्या स्त्रीत्वाचे नुकसान तर करीत नाही ना ? याचाही योग्य विचार करून आपले आचरण ठरवावे. समाजमाध्यमाचा सकारात्मक वापर काही प्रमाणात होत असताना कधी कधी ते आपल्या नैतिक मूल्यांच्या झपाट्याने र्हास करत आहेत असे जाणवते.समाजाची स्त्री कडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची प्रचंड गरज या मुळे निर्माण झाली आहे. स्त्रियांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी पुरुषांबरोबर स्त्रियांनी देखील केवळ निषेध,मोर्चा,आंदोलने ह्यापालिकडे जाऊन-  मूल्य व संस्कार ह्याचादेखील विचार करावयास हवा.आपल्या मुलांच्या हातात  मोबाईलरूपाने आलेले अमर्याद स्वातंत्र्य व त्याचे स्वैराचारात होणारे रूपांतर ह्यावर तातडीने विचारमंथन होणे गरजेचे झाले आहे. स्त्रीला एक वस्तू  समजणाऱ्या  मनोवृत्तीला,प्रवृत्तीला बेचिराख करायला हवे.


थोडे धारिष्ट्याने बोलताना असे वाटते की, विनयभंग व बलात्कार होऊ नये व ती मानसिकताच मनात निर्माण होऊ नये. याकरीता प्रत्येक मातेने व बापाने देखील ही आपली नैतिक जबाबदारी समजून आपल्या घरातून  कार्य सुरू करायला हवे.आपल्या पाल्याच्या जडणघडणीत वेळीच लक्ष द्यायला हवे.आजूबाजूस डोळसपणे पाहण्यास शिकले पाहिजे.असो ..


 


तर यातूनच नवनिर्मितीचा सोहळा सार्थकी लागणार आहे.


सखींनो आणि सख्यांनोसुद्धा खर सांगू ,एका सुदृढ  निकोप समाजासाठी आपणच  सारेजण एकदिलाने एकत्र आलो.चांगले संस्काररुपी बीज पेरले व पोसले.तसेच जिथे आणि जिला आपल्या मदतीची गरज असेल तिथे मदत करायची ठरवली. तर  नक्कीच आपण एक सुदृढ, सुसंस्कारीत सुजाण समाज घडवू शकू.


 


चला तर मग


 


--------- होऊया सज्ज ,हाती घेऊनी हात. 


           करूया साऱ्या अधःपतनावर मात.


 


          या सयांनो  या ,व्हा साथीदार आता.


       नवनिर्मितीच्या वाटेवर ,घडवू नवभारत आता.



Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...