बदलापूूर :- शहरातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरातील वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्याकरिता स्थानिक स्थरावरील नेते आपल्या परीने सर्वोत्तपरी प्रयत्न करीत आहेत, परंतु अशा कोरोना संकट काळात बदलापूरचे खासदार कुठे आहेत ? असा प्रश्न बदलापूर शहरातील सुज्ञ नागरिक करीत आहेत. प्रश्न पडण्यास कारणही तसेच आहे. गेल्या काही महिन्यात सन्माननीय खासदार कपिल पाटील यांचे शहरात दर्शन झालेले नाही.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे नुकतेच भिवंडी, कल्याण, वाडा, मुरबाड औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी स्वतंत्र कोरोना चाचणी केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली आहे. या पत्रदेखील खासदारांना बदलापूर शहरातील औद्योगिक क्षेत्राचा विसर पडल्याचे दिसत आहे. बदलापूर शहरात पूर्व भागात मानकीवली, शिरगाव या भागात विस्तीर्ण अशी औद्योगिक वसाहत आहे. याच भागातून खासदार कपिल पाटील यांना चांगली मतेही मिळालो. मात्र त्यानंतरही त्यांना बदलापूर शहरातल्या औद्योगिक भागाचा विचार पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजपचे विविध मतदारसंघात खासदार जातीने करोना रुग्णांची काळजी घेताना दिसतात. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी पासून कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पर्यंत प्रत्येक पक्षाचे खासदार आपापले मतदार संघात सर्वच भागात जातीने लक्ष देऊन मतदार संघात सक्रिय आहेत. परंतु मुरबाड विधानसभा मतदार संघातुन विशेषतः कुळगाव बदलापूर नगर पालिका हद्दीतून प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा दुपटीपेक्षा जास्त मते मिळवणारे खासदार मात्र बदलापूर शहरापासून अंतर राखून आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात बेड, ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर अशा अनंत समस्या उभ्या आहेत. त्यावर पालिका प्रशासन आणि शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आपापल्या परीने जीव धोक्यात घालून सहकार्य करत आहेत. अपवाद फक्त खासदार कपिल पाटील यांचा आहे.
आताही खासदार कपिल पाटील यांनी आरोग्य मंत्र्याना एक पत्र दिले आहे. राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे कामगारांना आरटीपीसीआर चाचणीची सक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय कामगारांना कामाच्या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. मात्र, आरटीपीसीआर केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे कामगारांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर चाचणी केंद्राच्या परिसरात दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर भिवंडी, वाडा, मुरबाड आदी एमआयडीसी क्षेत्रात नवीन चाचणी केंद्र सुरू करावे, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांना पत्राद्वारे केली आहे. त्यांची कागदोपत्री चिंता योग्य असली तरी निवडणुकीत झोळी भरून मतदान करणाऱ्या बदलापूरकरांची त्यांना चिंता दिसत नसल्याने ते काय फक्त भिवंडी शहराचे खासदार आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. तर काही नागरिक पालिका प्रशासनाच्या आणि स्थानिक नेत्यांच्या कामगिरीवर विश्वास आहे, त्यामुळे कुणी आले नाही तरी चालेल अशीही भूमिका व्यक्त करत आहेत.