बचाव कार्यादरम्यान हिमस्खलनामुळे झाले होते बेपत्ता
बर्फ वितळल्यावर 3 महिन्यांनी लागला मृतदेहाचा शोध
बदलापूर : भारतीय सैन्यातील जवान सुनील नागनाथ शिंदे हे लेहमध्ये बचाव कार्यादरम्यान शहीद झाले. शिंदे हे बदलापूरचे आहेत. आज पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूसमयी त्यांचे वय 36 वर्षे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मनमिळावू सुनील शिंदे शहीद झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बदलापुरवर शोककळा पसरली. तीन महिन्यानंतर त्यांचा मृतदेह ताब्यात मिळाला. आणि अखेर आज पहाटे शोकाकुल वातावरणात सुनील शिंदे अनंतात विलीन झाले. अमर रहे ! अमर रहे ! सुनील शिंदे अमर रहे ! अशा घोषणा देत देत साश्रु नयनांनी बदलापूरकरांनी निरोप दिला.
भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी विभागात वेहिकल मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. सध्या लेह परिसरात त्यांची पोस्टिंग होती. जानेवारी महिन्या अखेर लेह परिसरात हिमस्खलन झाल्यानं बचावकार्यासाठी भारतीय सैन्याची मदत घेण्यात आली होती. या बचाव कार्यादरम्यान सुनील शिंदे यांच्यासह अन्य काही जवान बेपत्ता झाले होते. मात्र बर्फाखाली गाडले गेल्यानं त्यांचा शोध लागू शकला नव्हता. अखेर हिमवृष्टी थांबल्यानंतर बर्फ वितळण्यास सुरुवात झाली, त्यावेळी शिंदे आणि अन्य जवान मृतावस्थेत आढळले. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर भारतीय सैन्याने शिंदे यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.
मंगळवारी रात्री उशिरा शहीद सुनील शिंदे यांचं पार्थिव बदलापूरच्या घरी आणण्यात आलं. कुटुंबीय आणि परिसरातील लोकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर रात्री 3 वाजता बदलापूरच्या मांजर्ली स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एक सैन्य अधिकारी आणि सात पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली.
सुनील शिंदे तीन महिन्यांपूर्वी येथे आले होते. एका विवाह सोहळ्यासाठी आले असतांना त्यांनी सर्वांची भेट घेतली होती. मात्र हि त्यांची अखेरची भेट असेल असे कोणाच्या स्वप्नीही नसेल. सैन्यात भरती होण्यापूर्वी सुनिल शिंदे महाराष्ट्र परिवहन महामंडळ विभागात नोकरीला होते. मात्र देश सेवा करण्याची त्याची प्रखर इच्छा होती आणि ती इच्छा त्यांनी खरी केली. तीन महिन्यांपूर्वी सर्वाना भेटून गेल्यावर आज पहाटे त्यांचे पार्थिव तिरंग्यात आलेले पाहून उपस्थितांनी हंबरडा फोडला.
भारतीय सैन्यात आपत्कालीन मदत करणारी जी टीम आहे त्यात ते काम करीत होते. लेह भागात त्यावेळी हिमस्खलन मोठ्या प्रमाणात झाले. त्यावेळेस मदतीसाठी गेलेल्या टीम मध्ये सुनील शिंदे हे सहभागी झाले होते. त्यांच्या बरोबर काही जण बर्फात गाडले गेले होते. आम्हाला दोन महिन्यानंतर हि माहिती मिळाली. त्या घटनेची सविस्तर चौकशी अद्याप सुरु असल्याचे सुनील शिंदे यांचे नातेवाईक संजय सोनावणे यांनी सांगितले.
हि घटना ज्या दिवशी कानावर आली त्यावेळी अंगावर काटा आला. त्यांचा जन्म उल्हासनगर येथे झाला होता. उस्मानाबाद येथे त्यांनी एस टी महामंडळात पहिली नोकरी कंडक्टर म्हणून केली. नोकरी करत असतानाच आय टी आय मधून प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेतल्यावर ते सैन्यात भरती झाले. कुटुंबात ते मोठे होते. समाजासाठी, देशासाठी काही तरी करायची त्यांची प्रचंड इच्छा होती ती त्यांनी खरी करून दाखवली. लहान पणापासूनच त्यांची ती इच्छा होती. तीन महिन्यांपूर्वी सुट्टीवर आले होते त्यावेळी ते सर्वानाच भेटून गेले होते. खूप वाईट झाले असल्याची प्रतिक्रिया त्यांचे मित्र विजय धावारे यांनी व्यक्त केली.
सुनील शिंदे हे अतिशय प्रेमळ होते. मनमिळावू स्वभावाचे होते. निसर्गावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. ते कवी होते. त्यांच्या कविता मी वाचलेल्या आहेत. अडीच महिन्यापूर्वी बोलणं झालं होतं. त्यांनी मला करिअरकडे लक्ष देण्याचे सांगितले. तुझं भवितव्य उज्ज्वल आहे, अभ्यासाकडे लक्ष दे असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. आम्ही सोबत राहिलो होतो. त्यावेळी मला त्यांनी काही टिप्सही दिल्या. त्यांचे देश प्रेम हे अगाध होतं. ते ज्यावेळी गावाला आले होते त्यावेळी ते सर्वांच्याच घरी गेले होते. आज आमच्या गावावर शोककळा पसरली असल्याची प्रतिक्रिया त्यांचे नातेवाईक समाधान कसबे यांनी व्यक्त केली.
दोन महिन्यांपूर्वी त्यांचे माझे फोन वर बोलणं झालं होतं. त्याचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. तो नेहमी भेटल्यावर पुस्तक वाचत रहा असे सांगायचा. सुट्टीवर आल्यावर तो आमच्या घरी आला होता. अभ्यास कर आणि करिअरकडे लक्ष देण्याचा नेहमी सल्ला द्यायचा. जे झालं ते फारच वाईट झालं असे सुनील शिंदे यांची मावस बहीण राजश्री कांबळे यांनी साश्रू नयनांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.