कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील कोरोना रूग्णसंख्या कमी करण्याच्या हेतूने गुरूवारी कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्यालयात स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक पार पडली. या बैठकीत मुरबाडच्या धर्तीवर आठ दिवसांचा कडक लॉकडाउन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ही बैठक संपन्न होताच स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी शनिवारपासून बदलापूर शहरात कडक लॉकडाउन लागू करणार असल्याबाबतचा संदेश चित्रफितीतून देण्यात आला.ही चित्रफीत वायरल होताच आज सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत धाव घेतली. त्यामुळे शहरातल्या किराणा दुकानांवर, भाजी पाला या दुकानात गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. बदलापूर पश्चिम आणि पूर्वेला बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. बदलापूर पश्चिमेच्या बाजारपेठांमध्ये रस्ते गर्दीने खच्चून भरले होते. त्यामुळे स्थानक परिसरात वाहतूक कोंडीही झाली होती. यावेळी अंतरनियमांचा फज्जा पहायला मिळाला.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही त्यामुळे माहिती घेण्याकरिता काही पत्रकार मुख्याधिकारी यांच्याकडे गेले असता मुख्याधिकारी यांनी पत्रकारांना नगराध्यक्ष दालनात थांबा असा निरोप दिला. परंतु अर्धा तास झाल्यानंतरही मुख्याधिकारी येत नाहीत असे समजल्यानंतर पत्रकारांनी मुख्याधिकारी यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला तर मुख्याधिकारी यांनी आपला फोन स्वीच ऑफ केला होता तसेच मुख्याधिकारी हे आपल्या दालनात उपस्थित नसल्याचे दिसून आले त्यामुळे मुख्याधिकारी हे पत्रकारांच्या आणि सर्वसामान्य बदलापूर करांच्या प्रश्नांपासून पळ काढत आहेत का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.