बदलापूर :- तोक्ते चक्रीवादळामुळे कुळगाव बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या भागात चांगल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांना दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट घेतली.तसेच तौक्ते वादळामुळे बदलापूर शहर, कुळगाव व परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये झाडे उन्मळून पडली आहे. पत्रांच्या शेडचेही मोठे नुकसान झाले आहे. ही बाब उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली असता उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ दखल घेत ठाणे जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून संवाद साधून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत .
तोक्ते वादळाने बदलापूर शहरात आणि आसपासच्या ग्रामीण भागात चांगलाचा तडाखा बसला आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे या भागात अक्षरश: दाणादाण उडाली होती, विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. रस्त्यात झाडे उन्मळून पडली आहे. ह्या वादळामुळे अनेक घरांची छपरे उडून गेली आहेत.वीज पुरवठा खंडीत झाल्याने शहरातील बराचसा भाग अंधारात बुडून गेला आहे या सर्व गोष्टींबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना अवगत करून माहिती देण्यात आली आहे, अशी माहीती आशिष दामले यांनी यावेळी दिली.तसेच उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांना कारवाईचे निर्देश दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.