बदलापूर :-कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील कोरोना रूग्णसंख्या कमी करण्याच्या हेतूने गुरूवारी कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्यालयात स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक पार पडली. या बैठकीत मुरबाडच्या धर्तीवर आठ दिवसांचा कडक लॉकडाउन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ही बैठक संपन्न होताच स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी शनिवारपासून बदलापूर शहरात कडक लॉकडाउन लागू करणार असल्याबाबतचा संदेश चित्रफितीतून देण्यात आला. ही चित्रफीत वायरल होताच सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत धाव घेतली. त्यामुळे शहरातल्या किराणा दुकानांवर, भाजी पाला या दुकानात गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. बदलापूर पश्चिम आणि पूर्वेला बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. बदलापूर पश्चिमेच्या बाजारपेठांमध्ये रस्ते गर्दीने खच्चून भरले होते. त्यामुळे स्थानक परिसरात वाहतूक कोंडीही झाली होती. यावेळी अंतरनियमांचा फज्जा पहायला मिळाला.
शहरात खरोखरच कडक लॉक डाउन करण्यात आला आहे का ? याबाबत विविध स्तरावर विचारणा होऊ लागली आणि प्रत्येक जण कडक लॉक डाऊन बाबत संभ्रमित होत होता अशा वेळी पालिकेकडून उत्तराची अपेक्षा होती अखेर पालिकेची उपमुख्य अधिकारी यांनी नगरपालिकेचे भुमिका स्पष्ट करत कुळगाव बदलापूर नगरपालिकेने जिल्हाधिकारी यांच्याकडे कडक लॉकडाऊन बाबत परवानगीसाठी पत्र दिले होते. मात्र त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने बदलापुरात नियमित लॉकडाऊनचे नियम (सकाळी 7 ते 11 अत्यावश्यक वस्तू खरेदी मुभा) लागू असतील असे सांगितले. त्यामुळे सकाळपासून संभ्रमित असलेल्या बदलापूरकरांचा जीव संध्याकाळी भांड्यात पडला.