बदलापूर :- शहरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या मंदावत असताना शहरात कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ठाणे यांनी पारित केले होते अखेर आज कठोर निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मागे घेतले आहेत. पूर्वीचे निर्बंध कायम राहतील असे आदेश देणारे सुधारित आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने आज पारित केले आहेत.
कुळगांव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात दि.०८/०५/२०२१ सकाळी ७.०० वा. पासून दि. १५/०५/२०२१ रोजी सकाळी ७.०० वा. पर्यंत या कालावधीत दवाखाने, बँक सेवा, जीवनावश्यक वस्तू घरपोच सेवा वगळून लॉकडाऊन लावण्यास प्रस्तावित केले होते. कुळगांव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात उक्त नमुद कालावधीसाठ अत्यावश्यक बाबींवर कठोर निर्बंध जारी करण्यात आले होते. मात्र भाजप वगळता शहरातील इतर राजकीय पक्षांनी कठोर निर्बंधाचे आदेश मागे घ्यावे याकरिता प्रशासनास विनंती केली होती तसेच मा. नगराध्यक्ष, शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत कडक लॉक डाउन चे आदेश मागे घ्यावे यासंदर्भात विनंती केली होती, त्यानुसार पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना सुधारित आदेश पारित करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आज आदेश पारित केले आहेत.
मुख्याधिकारी, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद यांनी , शहरातील रुग्ण संख्या कमी होत असून व्यापारी वर्गास लॉकडाऊनच्या निर्बंधांच्या अनुषंगाने पूर्वतयारीस पुरेसा अवधी न मिळाल्याने ग्राहकांना मागणी प्रमाणे पुरवठा करणे गैरसोयीचे ठरत असल्याने तसेच दि. १४/०५/२०२१ रोजी रमजान ईद हा सण असल्याने मुस्लीम बांधवांकडून व शहरातील नागरिकांकडून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याची विनंती होत आहे. त्यामूळे कुळगांव-बदलापूर शहरातील लॉकडाऊनचे निर्बंध उठविण्याबाबत मुख्याधिकारी, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद यांनी शिफारस केली होती. सदरची शिफारस मान्य करून जिल्हाधिकारी यांनी आज अखेर कठोर निर्बंध चे आदेश मागे घेतले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंती नुसार जिल्हाअधिकारी राजेश नार्वेकर ह्यांनी बदलापूर मधील लॉकडाऊन रद्द करण्याचे आदेश काढल्या बद्दल सर्व बदलापूर वासियांतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो. बदलापूर शहर हे राज्यसरकारने दिलेल्या नियमावली वर सुरू राहील. लॉकडाऊन काढले असले तरी जनतेने स्वतःची काळजी घ्यावी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर चा वापर करून वेळो वेळी हाथ धुवावे, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.हि लढाई आपण नक्की जिंकूया.
वामन बारकू म्हात्रे
शिवसेना शहरप्रमुख
मा.नगराध्यक्ष कुळगांव बदलापूर नगरपरिषद