बदलापूर :- सध्या शहरात मा. जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आदेशाने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्याधिकारी कुळगाव बदलापुर नगर परिषद यांनी केलेल्या मागणी नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात आज पासून 15 मेपर्यंत कडक निर्बंध लागू केलेले आहेत. शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याकरिता निर्बंध असावेत याबाबत कोणतेही दुमत नाही परंतु ज्यावेळी शहरात 200 पेक्षा जास्त रुग्ण सापडत होते अशावेळी कडक निर्बंध लादणे गरजेचे होते परंतु मे महिन्याच्या सुरुवातीपासून पाहिल्यास शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे असे दिसून येते. अशावेळी कोणतीही पूर्वसूचना न देता घाईघाईत काही राजकीय पक्षांच्या मागणीवरून मुख्याधिकारी यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून शहरात कडक निर्बंध घालण्याची मागणी केली. ही मागणी रास्त आहे किंवा कसे याबाबत चर्चा होऊ शकते परंतु शहरातील सध्याचे कोरोना रुग्णसंख्या आलेख पाहता शहरात खरोखरच खडक निर्बंध लादण्याची गरज होती का ? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
त्यामुळे मुख्याधिकारी यांनी दिल्लीचा कोरोना रिपोर्ट पाहून बदलापुरात लॉकडाऊनची मागणी केली की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरात सध्या विविध रुग्णायलात रिक्त असलेल्या खाटांची कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार
गौरी हॉल 38
आशीर्वाद हॉस्पिटल 7
सेवन पाम 3
पेंडुलकर हॉल 14
आनंद लॉन्स 24
सेंट्रल हॉस्पिटल 65
रेनी रीसॉर्ट हॉस्पिटल 113
एकूण 264 (DCHC DCH)
शहरात 250 पेक्षा अधिक (CCC) खाटा आहेत.
शहरात गेल्या सात दिवसात 763 करोना बाधितांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दररोज सरासरी 100 ते 110 रुग्ण बरे होत आहेत.
शहरात 7 एप्रिल रोजी 240 रुग्ण आढळले होते. तर 7 मे रोजी 101 रुग्ण आढळले आहेत.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरातील रुग्ण बरे होण्याचा दर 91 टक्के आहे. तर मृत्युदर अवघा 1 टक्के आहे.
शहरात रेमडिसिव्हीर इंजेक्शन पुरेशा प्रमाणात मिळत असून खुद्द आपण रेमडिसिव्हीर मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेत दिली आहे. तर शहराच्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सध्या दोन कंपन्या पालिकेने ठरवल्या आहेत. पालिकेला सध्या ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सूरु असल्याची माहिती पालिका आरोग्य अधिकारी देत आहेत.
म्हणजे शहरात सर्व प्रकारच्या खाटा शहरात रिकाम्या आहेत, शहरातला रुग्ण संख्या वाढीचा दर नियंत्रणात आहे. शहराला ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर सुरळीतपणे मिळते आहे. मृत्यू कमी झालेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मग प्रश्न असा आहे की पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यानी बदलापुरात लॉकडाऊनची मागणी कोणत्या आधारे केली ?