अंबरनाथ : महागाईच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू असतानाच अंबरनाथमध्ये देखील ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पेट्रोलचे वाढलेले दर लक्षात घेता दुचाकी गाडी देखिल चालवणे नागरिकांना शक्य नसल्याने या दुचाकीलाच फाशी देत काँग्रेसने प्रतीकात्मक आंदोलन केले.
महागाईचा झालेला भडका पाहता केंद्रसरकार इंधन दरवाढीवर कोणतेही ठोस निर्णय घेत नसल्याने केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयापर्यंत निदर्शने केली. महिला काँग्रेसच्या वतीने चुलीवर जेवण बनवत मोदी सरकारच्या विरोधात आणि इंधन दरवाढीच्या विरोधात आपला निषेध व्यक्त केला. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे केवळ इंधन दरवाढ होत नसून देशाची आर्थिक परिस्थितीदेखील दाखवत असल्याचा आरोप प्रदीप पाटील यांनी केला. सरकारी कंपन्या बंद करू खाजगी कंपन्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशातला कामगाराला दाबणारे सरकार म्हणून मोदी सरकार नावारूपाला आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. या आंदोलनात जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा संघाजा मेश्राम, नगरसेवक सुरेन्द्र यादव, चरण रसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.