अंबरनाथ- विधानसभा क्षेत्रात अंबरनाथ व उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ४ व ५ हा भाग समाविष्ट आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील पत्रकार/प्रतिनिधी विविध वृत्तपत्रात आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये वृत्त संकलानाचे काम करीत आहेत. तसेच येथे साहित्यिक व कलाकार नावारूपाला आले आहे. पत्रकार व कलाकार यांना काम करत असताना मानधनाच्या स्वरूपात मोबदला दिला जात असतो. परंतु, गेल्या काही वर्षांत घरांच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने अनेकांना स्वतःचे घर घेणे हे शक्य होत नसल्याने त्यांना यूएलसी कायद्या अंतर्गत अंबरनाथ व उल्हासनगर मधील रिकामी घरे देण्यात यावी अशी मंगळवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेऊन आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी लेखी मागणी केली आहे.
अंबरनाथ व उल्हासनगर शहर हे मोठ्या प्रमाणात विकसित होत असून येथे गृहसंकुलाची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. या गृहसंकुलात 'यूएलसी' कायद्या अंतर्गत अनेक सदनिका उपलब्ध आहेत. त्यामुळे यूएलसी मधील रिकाम्या व विनावाटप असलेल्या सदनिका अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील स्थानिक पत्रकार, साहित्यिक व कलाकार यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे उपलब्ध करुन देण्यात आल्यास घरांचा प्रश्न मिटुन त्यांना न्याय मिळेल असे ही आमदार डॉ. किणीकर यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे.