बदलापूर :- नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या सुट्टीमध्ये दहा शाळांतील पाचवी ते आठवी पर्यंतचे ४० विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते.
सायन येथील डी. एस. हायस्कुलच्या श्रीमती संध्या सावंत, डॉ. नैना लोखंडे यांनी मराठी तर श्रीमती पद्मा दासरी , यांनी बुद्धिमत्ता आणि गणित विषयाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पद्मा दासरी यांनी सोप्या शब्दात प्रश्न कसे सोडवायचे आणि कमी वेळात जास्त गुण कसे मिळवायचे याबाबत माहिती दिली. शिक्षकांनी जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून लक्षपूर्वक सोडवून घेण्याचा सल्ला डॉ. लोखंडे यांनी दिला. डॉ. जयश्री काळे - मोरे यांनी सूत्रसंचालन केले. पालिका शिक्षण विभाग प्रमुख विलास जडये, बेलवली शाळेच्या मुख्याध्यपिका श्रीमती माधुरी खाचणे आईनी शिबिराचे आयोजन केले होते.
पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी प्रशासनातर्फे विविध प्रकारचे उपक्रम, सराव परिक्षांच्या शिबिराचे आयोजन केले जाते , यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत असून पालिका शाळांची पटसंख्या वाढत असल्याचे शिक्षण विभागप्रमुख श्री. जडये यांनी सांगितले.