बदलापूर : राज्यातील एसटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे,ही काँग्रेसची भूमिका आहे. मात्र भाजपा एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचं काम करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. एसटी कामगारांनी आंदोलन थांबवावे असे आवाहनही त्यांनी केले.
बदलापूरात काँग्रेसच्या वतीने १४ नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या जनजागरण अभियानांतर्गत कार्यकर्त्यांशी व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी (ता.२१) बदलापूरात आले. यावेळी काँग्रेसच्या नूतनिकृत शहर कार्यालयाच्या उदघाटनानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी हे आवाहन केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे, निलेश पेंढारी, सचिव हरिश्चंद्र थोरात, राजेश घोलप, शहराध्यक्ष संजय जाधव,महिला जिल्हाध्यक्ष संघजा मेश्राम, अर्पणा खाडे,आस्था मांजरेकर,साधना ओव्हाळ,लक्ष्मण कुडव, रंजन एडवनकर आदी उपस्थित होते. नाना पटोले पुढे म्हणाले की, एसटी कामगारांच्या मागणीनुसार त्यांना बोनस, महागाई भत्ता आदी देण्यात आले आहे. परंतु राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरण हा एक दिवसाचा विषय नाही,असे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना काळात कशाप्रकारे नुकसान झाले आहे, केंद्र सरकार कशाप्रकारे दुजाभाव करत आहे हे समोर आहे. भाजपाच्या राजकारणात एसटी कामगारांचे नुकसान होणार आहे,त्यामुळे त्यांनी या आंदोलनातून बाहेर यावं, असे आवाहन नाना पटोले यांनी केले. त्यानंतर कात्रप येथे आयोजित सभेत कार्यकर्त्याशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी झटण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस राज्यात सत्तेत सहभागी झाली आहे. त्यामुळे कुणाला बांधील आहोत, अस समजण्याचे कारण नाही. काँग्रेस हा पक्ष शेतकऱ्यांचा, गरीब- सर्वसामान्यांचा पक्ष आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास बेरोजगार हाताला काम देण्याचा संकल्प काँग्रेसने केला आहे,हा संदेश जनतेपर्यंत पोहचविणे काळाची गरज असल्याचे पटोले यांनी सांगितले. केंद्र सरकार पेट्रोल डिझेलवर ६० रुपये अधिक सेस कर आकारत असल्याने ३० रुपयाला मिळू शकणारे पेट्रोल व २२ रुपयाला मिळू शकणारे डिझेल शंभरीपार झाले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असून भाजपाने कृत्रिम महागाई निर्माण केल्याचा आरोपही पटोले यांनी केला. नोटबंदी व खाजगीकरण, एनसीबी ईडी सारख्या यंत्रणांचा होत असलेला वापर आदी मुद्द्यांवरही त्यांनी भाजपाला टीकेचे लक्ष्य केले.
बॉक्स:
काँग्रेसला गतवैभव मिळवून देणार: संजय जाधव
बदलापूरात मध्यंतरीच्या काळात जनतेपर्यंत पोहचण्यात कमी पडल्याची प्रांजळ कबुली देतानाच आता काँग्रेसने नियोजनबद्ध पक्षबांधणी केल्याचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी सांगितले. पालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत असेल,असा विश्वास व्यक्त करतानाच काँग्रेसला बदलापुरात पुन्हा गतवैभव मिळवून देऊ,अशी ग्वाही संजय जाधव यांनी दिली.