अंबरनाथ :- शहरातील एकमेव उड्डाणपुलाला पर्याय देत शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अंबरनाथ शहरात दोन नव्या उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येकी २५ कोटी असा एकूण ५० कोटी रूपयांच्या निधीला एमएमआरडीएकडून मंजुरी मिळाली आहे. त्यासह रेल्वे स्थानक परिसरात सॅटीस उभारणीच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी ५० कोटी रूपयांना मंजुरी देण्यात आली आहे.
अंबरनाथ शहरातील महत्वाच्या १५ रस्त्यांच्या कामासाठी आणि इतर प्रकल्पांसाठी असा एकूण २५६ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. अंबरनाथ शहरातील पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा एकच उड्डाण पुलाची सुविधा आहे. त्यामुळे कल्याण-बदलापूर रस्त्यावर मोठया प्रमाणावर वाहतूककोंडी होते. या वाहतूककोंडीचा प्रश्नमार्गी लावण्यासाठी नव्याने दोन उड्डाणपुल प्रस्तावित करण्यात आले आहेत. अंबरनाथच्या मोरिवली आणि एएमपी कंपनी गेटच्या भागात असे दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार असून त्यांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
उड्डाण पुलासाठी ५० कोटी
या उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी ५० कोटी रूपयांचा खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच शहरातील इतर १५ रस्ते, प्रशासकीय इमारत, गोविंदतीर्थ पूल, नेहरू उद्यान, क्रीडासंकुल अश्या विविध कामाचा समावेश आहे. या सगळ्या कामांमुळे अंबरनाथ शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याने येथील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत