बदलापूर: बदलापुरात ओमीक्रॉंनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.हा २८वर्षीय पुरुष रुग्ण असून पोलीस कर्मचारी असल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश अंकुश यांनी दिली आहे. शहरातील कोरोना रुग्णसंख्या देखील वाढ झाली असून आज प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार आज आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 18 इतकी आहे.
सदर रुग्ण मुंबईच्या नायगाव पोलीस मुख्यालयात कार्यरत असून त्याची ड्युटी विधानभा अधिवेशनात होती. २५ डिसेंबरला त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर केलेल्या तपासणीत (रिदम स्टडी) त्याला ओमीक्रॉंन व्हेरियंटची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.या रुग्णाच्या पत्नीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असून या रुग्णाला कोणतीही लक्षण नाहीत. सध्या या रुग्णावर बदलापूरच्या गौरी कोविड रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश अंकुश यांनी दिली.तर बदलापुरात कोरोना रुग्णसंख्या कमी असली तरी पालिका प्रशासन सज्ज असल्याचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी स्पष्ट केले.सध्या बदलापुरात पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या गौरी हॉल येथील कोविड रुग्णालयात २५० व आदर्श विद्या मंदिर येथे १५० अशा ४०० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार आणखी बेडस उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने करून ठेवली आहे. डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचारीही उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र कोरोना नियमांचे पालन करून काळजी घ्यावी,असे आवाहन मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी केले आहे.