जिल्ह्यात उद्यापासून १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींच्या लसीकरणास सुरूवात



लसीकरणासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणे, दि. २ (जिमाका): मुंबई महानगर क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणास सुरूवात होत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुला-मुलींनी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन स्वत:बरोबरच कुटुंबाचं कोरोनापासून संरक्षणासाठी सज्ज होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात दहा केंद्रावर लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या सकाळी दहाच्या सुमारास वर्तक नगर माध्यमिक विद्यालय येथे करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय शहापूर, भिवंडी, ग्रामीण रुग्णालय मुरबाड तसेच प्रत्येक तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणार आहे. शहापूर तालुक्यातील वासिंद, अंबरनाथ तालुक्यातील वांगणी, कल्याण तालुक्यातील खडवली, भिवंडी तालुक्यातील आनगाव आणि मुरबाड तालुक्यातील शिवळा या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले. 

गोवेली येथील जीवनदिप कॉलेज आणि वरप येथील सेक्रेड हायस्कूल, अंबरनाथ नगरपरिषद, ऑर्डीनन्स फॅक्टरी, बदलापूर नगरपरिषद कोंडिलकर हॉल येथे देखील लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रावर सकाळी ९ ते ५ यावेळेत लसीकरण करण्यात येणार असून यासाठी कोविन संकेतस्थळावर दि. १ जानेवारीपासून रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी दिली.

दरम्यान, ठाणे महापालिकेच्यावतीने उद्या सकाळी दहा वाजता ब्राह्मण शिक्षण मंडळ संचलित वर्तक नगर माध्यमिक विद्यालय येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ पालकमंत्री श्री.शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...