येत्या १९ फेब्रुवारी रोजी राज्य शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. शिवसेनेनेही शासनासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी. मग एक तर तारखेप्रमाणे किंवा हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तिथी प्रमाणे. शिवसेना पक्ष आणि शासनाने एकाच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी. राज्य सरकारच्या पोलीस खाते अर्थात गृह खात्यावरील तसेच शिवसैनिकांवरील ताण कमी करावा हि माननीय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मनापासून, कळकळीची आणि आग्रहाची विनंती.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना २००२ साली त्यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र शिवसेना तिथी प्रमाणेच म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया या तिथीच्या दिवशी शिवजयंती साजरी करणार असल्याचे जाहीर केले होते. तेंव्हा पासून महाराष्ट्रात दोन दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुखांचा आदेश हा शिवसैनिकांना शिरसावंद्यच राहिला आहे. शिवसैनिक नेहमी तिथी प्रमाणेच शिवजयंती अतिशय उत्साहात आणि दिमाखदारपणे साजरी करीत आहेत.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवजयंतीच्या या उत्सवात विषमता दिसून येते आणि मन सुन्न होते. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आदर्श होते, आहेत आणि या पुढेही रहातील. अनेक देशात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अभ्यास केला जातो. अशा या महान राष्ट्रपुरुषांची जयंती साजरी करतांना शासकीय आणि पक्षीय असे भेद नसावे असे वाटते. राज्य सरकारतर्फे शिवजयंती साजरी होताना दुर्दैवाने तो उत्साह दिसून येत नाही जो शिवसेनेतर्फे साजरी होताना दिसून येतो. हि वस्तुस्थिती सर्वानी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन विचार करण्यासारखी आहे असे वाटते. कदाचित या मध्ये काही मतभेद असू शकतील.
राज्य सरकारतर्फे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते. त्या दिवशी शासकीय सार्वजनिक सुट्टी असते. तर शिवसेना ज्या दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया हि तिथी येते त्या दिवशी शिवजयंति साजरी करते मात्र त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी नसते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. यंदा शासनाची शिवजयंती हि १९ फेब्रुवारी हि शुक्रवारी येत आहे तर तिथी प्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हि सोमवार दिनांक २१ मार्च रोजी येत आहे.
२००२ नंतर बरेच राजकीय बदल घडले आहेत. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत आणि शिवसेना पक्ष प्रमुख हे सुद्धा उद्धव ठाकरे हेच आहेत. त्यामुळे दोन वेळा शिवजयंती साजरी करणार असल्याने प्रशासकीय तांत्रिक अडचण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ती तांत्रिक अड्चण लक्षात घेतली नाही तरी एकवेळ चालेल, मात्र राज्याच्या गृह खात्यावरील अर्थातच पोलीस यंत्रणेवरील येणारा ताण कमी करणे हि राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जबाबदारी आहे. सरकारी शिवजयंती साजरी करताना पोलीस यंत्रणेवर तितका ताण नसतो जितका शिवसेनेतर्फे शिवजयंती साजरी करतांना असतो. हि वस्तुस्थिती स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे असे वाटते. हा ताण इतके वर्षे मी अत्यंत जवळून पहात आलो आहे.
दुसरी तितकीच महत्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांवरील ताण कमी करणे होय. शिवसेना फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी शिवजयंती साजरी करीत आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश हा शिवसैनिकांना अत्यंत महत्वाचा असतो. तो आदेश पाळणे हे शिवसैनिक प्रथम कर्तव्य म्हणून पार पाडत असतात. ते कोणतीही तक्रार करीत नाहीत. गेली अनेक वर्षे शिवसैनिक शिवजयंतीची सुट्टी नसताना तिथी प्रमाणेच शिवजयंती साजरी करीत आले आहेत, आणि यापुढेही आदेशानुसारच साजरी करतील यात कोणतीही शंका नाही कि कोणाचीच तक्रारही नाही. मात्र तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करतांना आयोजक म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी आणि पोलीस यंत्रणेवर जो ताण आता पर्यंत आला आहे. त्याचा विचार करणे आवश्यक आहे. आणखी एक तांत्रिक मुद्दा म्हणजे सरकरी शिवजयंती साजरी करताना १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असते आणि त्यादिवशी कार्यक्रमाचे आयोजन करताना रात्री बारा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्याची, मिरवणूक काढण्याची परवानगी असते. सरकारतर्फे शिवजयंती साजरी करतांना साचेबद्ध कार्यक्रम राबविले जातात अर्थात त्याला कायद्याची बंधने आणि नियम असतात. म्हणून त्या दिवशी बहुतेक कुठेही भव्य मिरवणूक काढली जात नाही. मात्र नेमके या उलट परिस्थिती असते ती शिवसेना शिवजयंती साजरी करते त्या तिथीच्या दिवशी. एक तर सुट्टी नसल्याने शिवसैनिकांना सुट्टी घ्यावी लागते. अर्थात एका सुट्टी बाबत कोणत्याही शिवसैनिकांची मुळीच तक्रार नसते. मात्र सुट्टी नसल्याने कार्यक्रम आयोजित करताना आणि खासकरून मिरवणूक काढतांना पोलीस खात्याकडून सर्व परवानग्या काढताना नाकी नऊ येतात आणि पोलीस खात्यातील आधिकार्यांनाही कायदे पाळावे लागतात म्हणून सर्व सोपस्कार पार पाडावे लागतात. मिरवणूक काढताना सुट्टी नसल्याने कामावरून येऊन अथवा काम आटोपल्यावर मिरवणुकीत सहभागी होताना अर्थातच थॊडा उशीर होतो. आणि मग मिरवणूक सुरु होण्यासाठीही विलंब होतो. उशिरा सुरु झालेली मिरवणूक वेळेत म्हणजे दहा वाजताच संपवण्याची जबाबदारी हि आयोजक म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचीच असते. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी, उत्साहात सहभागी झालेले कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यात आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये अनेकवेळा वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व बाबींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सखोल चर्चा, विचार करून निर्णय घ्यावा. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्ष प्रमुख आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळकळीची आणि नम्र विनंती कि सरकारी तारीख बदलून तिथी प्रमाणेच सरकार आणि शिवसेना पक्षानेही एकत्रच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घ्यावा. एकत्र शिवजयंती साजरी केल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याप्रमाणेच त्यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा होऊ शकेल असे वाटते.
-- गिरीश वसंत त्रिवेदी, अंबरनाथ.
-------------------------