बदलापूर: केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी
केंद्रातील भाजप सरकार त्यांच्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करीत राज्यातील महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली आहे त्याचेच पडसाद आज बदलापूर मध्ये उमटले.
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई तसेच केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात बदलापूर शहरातील महाविकास आघाडीतील स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी राष्टवर उतरून कारवाईचा निषेध करीत निदर्शने केली. यावेळी केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शुक्रवारी(ता.२५) सकाळी ११ वा.च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिम भागातील अजय राजा हॉलजवळ एकत्र जमून निदर्शनास सुरुवात केली. ' वी सपोर्ट नवाब मलिक' असे लिहलेले फलक हाती घेऊन 'नवाब मलिक आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'बीजेपी सरकार..हाय हाय' अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केली.आंदोलक घोषणाबाजी करीत बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष दामले, प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष प्रियांका दामले, हर्षाली गायकवाड, अनघा वारंग, माजी नगरसेवक प्रभाकर पाटील,संजय कराळे,दिनेश धुमाळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव, प्रदेश सचिव हरिश्चंद्र थोरात, महिला शहराध्यक्ष आस्था मांजरेकर, रंजन एडववनकर, मनोज शुक्ला, सुरेंद्र भालेराव, शिवसेनेचे शहर सचिव प्रकाश सावंत,शेषधर प्रजापती, प्रमोद झुंजारराव आदी उपस्थित होते.