*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
ठाणे, दि, ३ (जिमाका): राज्यात कोरोना निर्बंध शिथील करण्यासाठी काल जाहिर झालेल्या राज्य शासनाच्या निकषांमध्ये महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक ग्राह्य धरलेत आहे. त्यामुळे या निकषांची पूर्तता करणाऱ्या जिल्ह्यातील ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आज घेतला. तसेच कोरोना निर्बंधासाठीच्या निकषामध्ये मुंबई महानगराशी असलेली संलग्नता विचारात घेता ठाणे जिल्हा हा मुंबई महानगर क्षेत्राचा एक घटक समजण्यात यावा अशा आशयाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याबाबत आजच्या बैठकीत एकमताने निर्णय झाल्याचे प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी या महापालिकांचे अतिरक्त आयुक्त, उपायुक्त, पोलिस आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, राजाराम तवटे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर म्हणाले, राज्य शासनाने काल कोरोना निर्बंध शिथील करण्यासाठीचे निकष जारी केले आहेत. जिल्ह्याचा लसीकरण टक्केवारीमध्ये पहिला डोस ९० टक्क्यांपेक्षा अधिक, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असावा, ऑक्सिजन खाटा ४० टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेल्या असाव्यात असे चार निकष असून ते पूर्ण करणाऱ्या १४ जिल्ह्यांच्या यादी मध्ये ठाण्याचा समावेश नाही. ठाणे जिल्हा चार पैकी तीन निकष पूर्ण करीत असून लसीचा पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ८६ टक्के आहे. केवळ या निकषामुळे ठाण्याचा समावेश होऊ शकला नाही.
मात्र राज्य शासनाने निर्बंध शिथील करताना महापालिका एक स्वतंत्र प्रशासकीय घटक ग्राह्य धरले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्या क्षेत्रात कोरोना निर्बंध शिथील करण्याचे अधिकार दिले आहे. त्यानुसार आज जिल्हा आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरणाची तातडीची बैठक झाली. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात लसीचा पहिला डोस ११३ टक्के तर दुसरा डोस ९८ टक्के जणांनी घेतला आहे तर ठाणे महापालिका क्षेत्रातही पहिला डोस ९० टक्के आणि दुसरा डोस ७४ टक्के झाल्याने राज्य शासनाच्या चारही निकषांची पूर्तता होत असल्याने या दोन्ही महापालिका क्षेत्रात कोरोना निर्बंध शिथील करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. उर्वरित महापालिका, नगरपालिका क्षेत्रात निर्बंध कायम राहतील, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या परंतु ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस मुंबई तसेच अन्य महापालिका क्षेत्रात घेतला आहे. त्यामुळे कोरोना निर्बंधांसाठीच्या निकषामध्ये ठाणे जिल्ह्याला मुंबई महानगर क्षेत्राचा घटक मानण्यात यावे यासंदर्भात प्राधिकरणाच्या आजच्या बैठकीत चर्चा झाली. तसे झाल्यास ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्राला निर्बंध शिथिलतेचा लाभ मिळू शकतो. यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
००००