*नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*
ठाणे, दि. १४ (जिमाका): ठाणे जिल्ह्याला दि. १६ मार्चपर्यंत उष्ण लहरीचा (हीटवेव) तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या काळात दुपारी बारा ते चार या दरम्यान शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दि. १४ ते १६ मार्च याकालावधीत मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही उष्ण लहर जाणवणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार उष्माघातापासून बचाव करण्याकरिता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, उष्णलहरींपासून बचावासाठी काय करावे याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले की, दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळावे. तहान नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ व सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना सनग्लासेस, स्कार्फ, छत्री, टोपी यांचा वापर करावा. प्रवासा दरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्याने डोके, चेहरा झाकावा असे त्यांनी सांगितले.
०००००