*महिलांच्या पंखांना व्यावसायिक बळ देण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर*
ठाणे, दि.८ (जिमाका): कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबतच घरातील मुलं-मुली वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी घेतील यासाठी महिलांच्या पंखांना व्यावसायिक बळ देण्याच काम प्रशासनामार्फत केल जात असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे सांगितले.
जिल्हा नियोजन समिती आणि समाज कल्याण विभागाच्या निधीतून अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत अनुसूचित जातीतील विधवा महिलांना शिलाई यंत्र वाटप आणि प्रशिक्षणाचा शुभारंभ दिघा येथील इलटन पाडा येथे आज झाला. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. नवी मुंबई महापालिका स्थायी समिती सभापती नविन गवते, महापालिकेच्या महिला व बालविकास सभापती अपर्णा गवते, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त बलभीम शिंदे, दिघाचे सरपंच अनिल गवते तसेच जनसेवा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
उपस्थितांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर म्हणाले, यावर्षीच्या महिला दिनाच्या संकल्पनेनुसार महिलांना बळ देणे आणि त्यांना समाजात स्वाभिमानाने उभ करण्यासाठी काम केल जात आहे. महिलांना शिलाई यंत्रासोबत त्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे शिवाय त्यांना त्यातून रोजगार मिळेल याची देखील खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शिलाई यंत्र हे महिलांसाठी उदरनिर्वाहाचे साधन आहे त्यातून कुटुंबाला बळ देतानाच त्या कुटुंबातील मुली देखील अधिकारी, पायलट, उद्योजिका, डॉक्टर, अभियंत्या व्हाव्यात अशा शुभेच्छा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
कोरोनामुळे पतीचं निधन झालेल्या अनुसूचित जातीतील विधवा महिला ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं उदरनिर्वाहाचे साधन नसल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. या महिलांचे कायमस्वरुपी पुनर्वसन होईल अशी योजना तयार करणे बाबत जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार सर्वे करून महिलांना स्वयंरोजगारासाठी सामाजिक न्याय विभाग, ठाणे यांचेकडून राबविण्यात येत असलेल्या अनुसूचित जाती उपाय योजने अंतर्गत अनुसूचित जातीतील गरीब, गरजू, परितक्ता, घटस्फोटीत व प्राधान्य क्रमाने कोविड कालावधी मध्ये विधवा झालेल्या महिलांना शिलाई मशिन प्रशिक्षण व वाटप ही योजना अमलात आणली, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले.
*या योजनेचे स्वरुप असे:*
लाभार्थी महिलेस १० दिवसांचे शिलाई यंत्र चालविणे, दुरुस्त करणे याचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर लाभार्थ्यास विजेवर चालणारे शिलाई मशिनचे वाटप केले जाईल. यंत्राचा वर्षभराचा देखभाल दुरूस्तीचा खर्च केला जाईल. लाभार्थी महिलेचा व तिच्या कुटुंबाचा एक वर्षांचा अपघात विमा काढण्यात येईल.
०००००