मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी
ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
- उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम
मतदार यादीत आधार क्रमांक जोडणी करणे ऐच्छिक
ठाणे, दि. 15 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार कार्डशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार आहे. आधार क्रमांक जोडणी ऐच्छिक असल्याने जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी, त्यासाठी राजकीय पक्ष, संघटनांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी आज येथे केले.
कालबद्धपद्धतीने मतदारांकडून आधारक्रमांक प्राप्त करून घेण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने सुरू केला आहे. मात्र, मतदान कार्डबरोबर आधार जोडणी ऐच्छिक आहे. या मोहिमेसंबंधी माहिती देण्यासाठी आज राजकीय पक्ष, संघटनांची बैठक श्रीमती कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी श्रीमती कदम यांनी आवाहन केले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अशी होईल नोंदणी
प्रत्येक मतदारांकडून आधार क्रमांक विहीत स्वरूपात व विहीत रितीने मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. 17 जून 2022 च्या अधिसूचनेनुसार 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक व्यक्ती त्याचा आधारक्रमांक अर्ज क्र.6 ब मध्ये भरून देऊ शकतो. आवश्यक अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध केला जाणार असून अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब निवडणूक आयोगाच्या विविध माध्यमांवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी विशेष मोहिम दि. 1 ऑगस्ट 2022 पासून होणार आहे. या मोहिमेत मोठ्या संख्येने आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. तसेच आगामी गणेशोत्सव, नवरात्रीमध्ये मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.
याबरोबरच नमुना अर्ज क्र.6,7 व 8 मध्ये 1 ऑगस्ट 2022 पासून सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच नमुना 6 ब नव्याने निर्माण करण्यात आला आहे. सुधारित अर्जानुसारच मतदारांनी मतदार यादीतील बदल अथवा नोंदणीची प्रक्रिया करावी, असे आवाहनही श्रीमती कदम यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या सुमारे 8 लाख 18 हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे काही केंद्रांवरील मतदारांची संख्या कमी झाली आहे. तर पलावा सारख्या गृहसंकुलामध्ये एका मतदान केंद्रावर 5 हजार पेक्षा जास्त मतदारांची नोंद झाली आहे. अशा ठिकाणी पाच मतदान केंद्रे मंजुर करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. पुढील दीड वर्षात आणखी मतदार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण करण्यात येणार असल्याचे श्रीमती कदम यांनी यावेळी सांगितले.
00000000